ठळक मुद्देपर्जन्यराजाला साकडे महिला भाविकांची संख्या लक्षणीय जिल्हाभरातून सेवेक-यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली
नाशिक : ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुमाउली की जय’च्या गजरात व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करत मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने स्वामी समर्थांच्या शेकडो सेवेकरी, क ष्टकऱ्यांनी गंगा गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजाला साकडे घातले. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.
निमित्त होते, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२२) रामकुंडावर गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात आला. पवित्र अधिकमासाचे औचित्य साधून अधिक ज्येष्ठ शुध्द अष्टमीच्या मुहूर्तावर पर्जन्यराजाला साकडे घालण्यासाठी सालाबादप्रमाणे या सोहळ्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. संध्याकाळी गोदाकाठावर रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी मंदाकिनी मोरे, आमदार सीमा हिरे, नगरसेवक वत्सला खैरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शिवाजी भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी शुक्ल यांनी दक्षिणवाहिनी गोदावरीचे धार्मिक माहात्म्य उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर पर्जन्य सुक्ताच्या पाठाला प्रारंभ करण्यात आला. सुमारे अर्धा तास उपस्थित शेकडो भाविकांनी पर्जन्य सुक्ताचे सामूहिक पठण केले. त्यानंतर अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगागोदावरी पूजनाला प्रारंभ झाला. पूजनानंतर गणरायाची व गोदावरीची आरती करण्यात आली.
अधिकमासातील शुध्द प्रतिपदा ते दशमीपर्यंत सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगापूजन केले जाते. गंगा गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत असून, दक्षिणवाहिनी गोदावरी आंध्र प्रदेशमध्ये सागराला जाऊन मिळते. शेकडो मैलांचा गोदाकाठ असून, जेथे जेथे शक्य होईल तेथे समर्थ सेवेकरी व भाविक दरवर्षी गंगापूजन करतात, अशी माहिती संयोजकांनी दिली. त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थान व कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या रामकुंड येथून गंगापूजनाला प्रारंभ करण्यात आला. गोदावरीच्या आरतीनंतर गुरुमाउली यांनी सपत्नीक गोदावरीची ओटी भरली. या गंगा दशहरा सोहळ्यास जिल्हाभरातून सेवेक-यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.संपूर्ण सजीवसृष्टी सुखी व्हावी आणि पर्जन्यराजाची कृपादृष्टी लाभावी. सर्वत्र समाधानकारक व सुखावह वर्षा होऊन बळीराजा सुखावेल या उद्देशाने परंपरेनुसार गंगा दशहरा उत्सव गोदाकाठावर पार पडला. सजीवसृष्टीची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीचा सन्मान करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.-अण्णासाहेब मोरे, गुरुमाउली