नाशिक : माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि. ७) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून, दुसरे पुष्प गुंफताना सरस्वती म्हणाले, माणसाच्या बुद्धीचा नाश हा केवळ त्याच्या काम व क्रोधामुळे होतो. स्वत:च्या अध:पतनाला तो स्वत: जबाबदार असतो.जितक्या तीव्रतेने राग, द्वेष उफाळून बाहेर येतात तितक्याच तीव्रतेने भोगवासना निर्माण होत जाते आणि माणूस अधर्मी होऊन क्रूरकर्म करण्यास प्रवृत्त होतो. माणसाकडे विचार करण्याची शक्ती आहे तरी माणूस क्रूर व एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा का वर्तणूक करतो? विविध पदव्या घेऊन माणूस सुधारत नसतो. पदव्याने माणसाच्या बहिरंगाचा विकास होत असला तरी अंतरंगाचा विकास अपूर्ण राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. माणसातील काम, क्रोध, द्वेष हे दोष जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत त्याला आत्मशांती लाभू शकत नाही आणि तो ‘माणूस’ म्हणून जगूही शकत नाही. उपभोग घेण्याची लालसा निर्माण झाली तर मन थांबत नाही. मनावर नियंत्रण मिळविणे माणसाला अवघड होत जाते. मनावर नियंत्रण व ताबा ठेवण्यासाठी काम, क्रोध, राग, द्वेष यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि. १२) होणार आहे.
काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश स्वामी स्वरूपानंद : शंकराचार्य न्यासतर्फे व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:22 AM