नाशिक- रिक्षाचालक वडिलांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. यामुळे साहजिकच बालपणापासून संघर्ष करावा लागला. मात्र, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी असल्यास, प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, याची प्रचिती स्वप्निल पवारच्या यशातून आली आहे.
द्वारका परिसरातील रहिवासी स्वप्निल जगन्नाथ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ४१८वी रँक मिळविली आहे. त्यामुळे कष्टकरी कुटुंबीयांना आकाश ठेंगणे झाले आहे. शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्या स्वप्निलने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पेठे विद्यालयातून पूर्ण केले. शाळेत असतानाच परिस्थितीवर मात करण्याची खूणगाठ मनाशी बांधून स्वप्निलने मोठे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी दहावीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली. दहावीत ९३ टक्के गुण मिळविल्यानंतर पुढील शिक्षणासाठी केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथून बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर, पुण्यातून केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर, एका खासगी कंपनीत काही काळ नोकरी केली. नोकरी करताना मिळेल त्या वेळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. २०२० साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत नियुक्ती झाली. सध्या पुणे येथे त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, तेवढ्यावरच न थांबता, स्वप्निलने अभ्यास सुरूच ठेवत पुन्हा परीक्षा दिली. सोमवारी (दि. ३०) या परीक्षेचा निकालात ४१८वी रँक मिळविल्याने स्वप्निल व कुटुंबीयांच्या आनंदाला उधाण आले. नेहमी अभ्यासात व्यस्त राहण्यापेक्षा वेळेचे योग्य व्यवस्थापन, जिद्द, चिकाटीने मेहनत केल्यास यश निश्चित मिळते, असे स्वप्निलने सांगितले.अक्षयने तिसऱ्या प्रयत्नात केले आईचे स्वप्न साकार -शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्षय वाखारेने एका सेवाभावी संस्थेत काम केले. या दरम्यान विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने शासकीय सेवेत जाऊन, आपण या योजना अधिक प्रभावीपणे राबवू शकतो, याची जाणीव झाल्याने आईचे स्वप्न साकार करण्यासाठी अक्षयने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासला सुरुवात केली. मात्र, सलग दोन वेळा पूर्व परीक्षेतच अपयश आले, तरीही खचून न जाता, पुन्हा जोमाने अभ्यास करून, अक्षयने तिसरी परीक्षा दिली. यात त्याने देशभरातून २०३वी रँक मिळवत उत्तुंग यश संपादन केले. अक्षयचे वडील नाशिक रोडच्या करन्सी नोटप्रेसचे कर्मचारी, तर आई गृहिणी आहे. प्राथमिक शिक्षण विनिता विकास मंडळ, माध्यमिक शिक्षण पुरुषोत्तम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर, शासकीय तंत्रनिकेतनमधून मॅकेनिकल डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण केली. त्यानंतर, पुणे येथील सेवाभावी संस्थेत काम करताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.