नाशिक : ‘चांदणे शिंपीत जाशी’,‘ऐन दुपारी’ आदी विविध गीतांचे गायन, समर्पक असे निवेदन, तितक्याच ताकदीने मिळणारी संगीत साथ, यामुळे श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते ‘चांदणे शिंपीत जाशी’ कार्यक्रमाचे. स्वरदा म्युझिक अकॅडमीतर्फे वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि.२८) सायंकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ही मैफल उत्साहात पार पडली. यावेळी प्रसिद्ध गायक शुभदा बाम-तांबट यांनी ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’, ‘शपथ या बोटांची’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’, ‘तरुण आहे रात्र’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘ मी मज हरपून’, ‘देव जरी मज’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘का हो धरीला मजवर राग’, ‘विसरशील खास मला’, ‘गेले द्यायचे राहून’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘आला वसंत ऋतु’ ‘का रे दुरावा’, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘शपथ या बोटांची’ आदी विविध मराठी गीते आपल्या दमदार आवाजात सादर केली. त्यांना साक्षी देशपांडे, मनस्वी मालपाठक, श्रद्धा पवार, प्रणव भार्गव, नरेश ठाकूर यांनी सहगायनाद्वारे साथ दिली, तर प्रमोद पवार (हार्मोनियम), निनाद तांबट (की- बोर्ड), नवीन तांबट (तबला ढोलकी), ऋतुजा जोशी (साइड ºिहदम), महेश कुलकर्णी (गिटार) यांनी साथसंगत केली. हृषिकेश आयचित यांनी निवेदन केले. टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारा प्रतिसाद यामुळे वाढत्या तपमानात शीतलतेचे वातावरण रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळत होते. याप्रसंगी स्वरदा म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थी, पालक आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वरांजली : सुमधुर गाण्यांमध्ये श्रोते दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:35 AM