नाशिकरोड : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर कठड्याला लागून मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. एखादा माथेफिरू किंवा अन्य कोणी हे दगड खाली कोणावर फेकल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. स्वा. सावरकर उड्डाणपुलावर सिन्नरफाटा बाजूकडून दत्तमंदिर सिग्नलकडे येताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात उड्डाणपुलाच्या कठड्याला एका रांगेत मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. एखादा माथेफिरू, मद्यपी अथवा अन्य कोणी व्यक्तीने सदर दगड उचलून खाली रस्त्यावर कोणाच्या अंगावर अथवा वाहनांवर टाकल्यास मोठा अपघात, दुर्दैवी घटना घडू शकते. रात्रीच्या वेळी कठड्याला लागून असलेले दगड दिसत नसल्याने उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या दृष्टीनेदेखील धोकेदायक आहे. मनपाने त्वरित लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या कठड्यालगत ठेवलेले मोठमोठे दगड उचलावेत, अशी मागणी जागृत वाहनधारकांनी केली आहे. तसेच उड्डाणपुलाच्या कठड्यावर पथदीपांची वायर काही ठिकाणी ओढण्यात आली आहे. उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात धूळ व घाण साचली असून ती स्वच्छ करण्यात यावी. उड्डाणपुलाचे कठडे व दुभाजक धूळ व वाहनांच्या धुराने काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळी दिसत नाही. मनपाने उड्डाणपुलाचे कठडे व दुभाजकस्वच्छ करून रंगरंगोटी करण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल कठड्यालगत दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:23 AM