नाशिक : नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४४ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कठोर पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक बनविले. भारतीय तोफखाना नाशिकरोड रेजिमेंटच्या अशा एकूण २७२ कुशल नवसैनिकांची तुकडी देशसेवेत गुरूवारी (दि.१४) लष्करी दिमाखात दाखल झाली. भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज असून वेळेप्रसंगी बलिदान करण्यासही तयार असल्याची शपथ यावेळी या नवसैनिकांनी तोफांच्या साक्षीने घेतली.भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून सेना पदक विजेते मेजर जनरल असीम कोहली हे उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्वीकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दीत सदैव स्मरणात ठेवावी. तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून, भारतातील सैन्यदलाच्या सुमारे २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. या नवसैनिकांवर मला गर्व असून त्यांच्या संचलनाची समीक्षा करण्याची मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व ‘तोपची’ आपली जबाबदारी वेळोवेळी ओळखून कौशल्यपूर्ण कामगिरीने केंद्राचे नाव उज्ज्वल करतील असे ते म्हणाले. उपस्थित जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली.दरम्यान, २७२ नवसैनिकांचे नातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा येथील हिरवळीवर रंगला. यावेळी माता-पित्यांसह आजी-आजोबांनी नवसैनिकांना जवळ घेत मायेचा हात फिरवून चांगल्या भविष्यासाठी शुभआशिर्वाद दिले. लष्करी अधिका-यांनी माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदान केले. यावेळी अनेकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी जवान अमोल गामणे याने खास शैलीत केले.