नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले.
पेठ तालुक्यातून प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या हिरा कैलास गारे या महिलेला सकाळी लघुशंकेसाठी गेली असताना मंगळवारी (दि.८) मारहाण झाली होती. सफाई कर्मचारी महिलेने गर्भवतीच्या कानफटात देखील मारत तुला तीन महिने जेलमध्येच टाकते, मग तिथेच डिलेव्हरी करते असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली होती. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच त्या महिलेला कळा येऊन तिची प्रसूती झाली. त्यावेळी देखील तिथे सिस्टर आणि डॉक्टर तत्काळ पोहोचले नसल्याचा आरोप केला होता. संबंधित अर्भक अत्यवस्थ असल्याने त्याला दोन दिवस काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर गुरुवारी (दि. ११) सकाळी बाळाचा मृत्यू झाल्याचे पालकांना कळविण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अर्भकाच्या पालकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमून २४ तासात अहवाल देण्याचे आदेश दिले होते. समितीच्या अहवालानंतर करुणा चौधरी या सफाई कर्मचारी महिलेला निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
इन्फो
तत्काळ निलंबन
अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सफाई कर्मचारी महिलेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टर आणि सिस्टर संदर्भात करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक