नाशिक : येथील आडगावकर कुटुंबातील कन्येचा विवाह मुस्लीम धर्मातील युवकाशी लावून देण्याचा निर्णय हा दोन्ही कुटुंबीयांनी घेतलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू, मुस्लीम किंवा लव्ह जिहाद असा रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले. कडू यांनी स्वत:हून आडगावकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या भावना व्यक्त करत विवाहाबाबत समाजाने किंवा समाजमाध्यमांनी वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले.
शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी शुक्रवारी दुपारी प्रसाद आडगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन या प्रकरणातील वस्तुस्थितीची सर्व माहिती जाणून घेतली. स्वत: मुलीसह तिच्या वडिलांशी संवाद साधला. तसेच हा विवाह त्यांच्या मर्जीने होत असल्याने त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांनी समाजात कुणीही चुकीच्या पद्धतीने भावना भडकावण्याचे काम न करण्याचे आवाहन केले. माझी कन्या दिव्यांग असल्याने अपेक्षित स्थळे येत नसल्याने आणि संबंधितांकडून प्रस्ताव आलेला होता. त्यामुळे आम्ही दहा वर्षांच्या विचाराअंती हा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबीयांनादेखील मी या निर्णयासाठी तयार केले. आमच्या दोन्ही कुटुंबांचा एकमेकांशी वीस वर्षांपासून परिचय असून, दोन्ही कुटुंबांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. मुलीला समजून घेणारा, तिच्या अडचणीत तिला साथ देणाऱ्या योग्य मुलाची अर्थात आसिफ खानची निवड केली असल्याचेही आडगावकर यांनी नमूद केले.
कोट
हिंमत असेल तर तिथे जा...
हिंदू-मुस्लीम अशा पद्धतीची अनेक लग्ने यापूर्वीही झाली आहेत. अनेक मोठमोठ्या नेत्या, अभिनेत्यांनी असे विवाह केलेले आहेत. त्यामुळे जर कुणाला विरोध करायचाच असेल आणि त्यांच्यात इतकी हिंमत असेल तर त्यांनी प्रथम तिथे जाऊन विरोध करावा.
बच्च कडू, शिक्षण राज्यमंत्री
-------------------
कोट
चांगल्या भावनेतून स्वीकारा
या प्रकरणात प्रसारमाध्यमांनी योग्य ती बाजू दाखवली असली तरी समाजमाध्यमांनी वस्तुस्थिती जाणून न घेता त्यावर मते व्यक्त केली. हा निर्णय दोन्ही कुटुंबांनी मिळून घेतलेला असल्याने चांगल्या भावनेतून त्याचा स्वीकार करावा. तसेच यापुढे जर समाजमाध्यमांवर यापुढे कुणी अयोग्य कॉमेंट्स टाकल्या तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
प्रसाद आडगावकर, कन्येचे वडील
-----------
कोट
माझ्या विवाहाबाबतच्या निर्णयासाठी सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिल्याने मला खूप खरे वाटते आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद.
रसिका आडगावकर, वधू
--------
कोट
मी खूप वर्षांपासून तिला ओळखतो. प्रारंभी तिच्या अपंगत्वाबाबत माहिती नव्हते. मात्र नंतर माहिती झाल्यावरही प्रेम कायम राहिले. आमचे दोघांचे पालक आमच्या पाठीशी उभे होते, त्यामुळे प्रेशर जाणवले नाही. मात्र, काहीच जाणून न घेता आरोप करणे अयोग्य असून, कुणीही सत्यस्थिती जाणून मते व्यक्त करायला हवी.
आसिफ खान, वर