नाशिक : शहर व जिल्ह्णात स्वाइन फ्लूचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झालाआहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दोन महिला व एका पुरुषाचा शुक्रवारी (दि़२१) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील उपनगर, सिन्नर तालुक्यांतील माळेगाव व अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील रुग्णाचा समावेश आहे़ स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.उपनगर परिसरातील सरला विसपुते (५२) यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाल्याने गुरुवारी (दि.२०) सायंकाळी खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, त्यांचा शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील राजेंद्र श्रावण सिंग (५५) यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना शुक्रवारी (दि़२१) जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल केले असता अवघ्या तासाभरात त्यांचा मृत्यू झाला.अहमदनगर जिल्ह्णाच्या अकोले तालुक्यातील रहिवासी सखुबाई बन्सी सोनवणे (४२) यांना स्वाइन फ्लूसदृश आजारामुळे मंगळवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि़२१) त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर आणि अकोले येथील रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ दरम्यान, सद्य:स्थितीत स्वाइन फ्लू कक्षात २१ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़
नाशिक जिल्ह्णात ‘स्वाइन फ्लू’ने तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:53 AM