नाशिक : वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होत असून, दोन दिवसांत शहरातील जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये चार रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. संबंधित रुग्णांवर उपचार सुरू असून, महापालिकेने सुरू केलेल्या स्क्रिनिंग सेंटरवर आतापर्यंत १३७ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत गारवा वाढण्याबरोबरच दिवसा कडक उन्हाचाही अनुभव नाशिककर घेत आहेत. शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत भरच पडत असून, गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये चार रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आढळून आल्याचे मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. सदर रुग्णांमध्ये एक महिला रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असून, ती मूळची बुलढाणा येथील रहिवासी आहे. या महिलेवर लोणी-प्रवरा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिकला आणण्यात आले. शहरातील पोलीस अकॅडमी आणि वडाळागावातील प्रत्येकी एक महिला रुग्णही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असून, सटाणा येथील महिला रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये नऊ बाहेरचे असून, पाच शहरातील रहिवासी आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लूने पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यातील दोन रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्क्रिनिंग सेंटरमध्ये गेल्या दीड महिन्यात २०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यातील स्वाइन फ्लू संशयित १३७ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. नागरिकांनी स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच महापालिकेच्या स्क्रिनिंग सेंटरवर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार
By admin | Published: February 17, 2015 1:14 AM