नाशिक : ऊन, पाऊस या वातावरणातील बदलांमुळे स्वाइन फ्लूचा जिल्ह्यात फैलाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू संशयित रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत चालली आहे़ सद्यस्थितीत स्वाइन फ्लू कक्षात बारा रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर, तर एकास अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे़दिवसा दमट, दुपारनंतर कोसळणारा पाऊस यामुळे निर्माण होणारा गारवा याचा परिणाम आरोग्यावर होत आहे़ सद्यस्थितीतील वातावरण हे स्वाइन फ्लू रोगाच्या फैलावासाठी पोषक असून सर्दी, खोकला व तापाचा वेगाने प्रसार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या १२ रुग्णांमध्ये सहा महिला व सहा पुरुष आहेत़ यामध्ये तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे़ यापैकी एकास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे़, तर उर्वरित नऊ संशयित रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही़ सर्दी, खोकला, ताप तसेच घशामध्ये त्रास अशी लक्षणे आढळून येताच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाºयांनी केले आहे़
‘स्वाइन फ्लू’चा फैलाव, रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:45 AM