नाशिक : महापालिका व शासन स्तरावर शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता कमी करण्यासाठी जागृतीपर कार्यक्रम हाती घेतले जात असले तरी अद्याप स्वाइन फ्लूचा जोर कायम असून, एप्रिल महिन्यात गेल्या सहा दिवसांत १८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लूने १८ जणांचा बळी घेतला आहे.मुंबई-पुणेनंतर नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा जोर वाढतच चालला आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शहरातील खासगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयांत वाढत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील १४७ रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. १ जानेवारी ते ६ एप्रिल या कालावधीत ८७ रुग्ण स्वाइन फ्लूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ४३ रुग्ण हे महापालिका हद्दीबाहेरील असून त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४४ रुग्ण हे महापालिका हद्दीतील असून, त्यातील ५ जणांचा बळी गेला आहे. महापालिका हद्दीबाहेरील बळी गेलेले रुग्ण हे सर्व खासगी रुग्णालयात उपचार घेत होते तर मनपा हद्दीतील बळी गेलेल्या पाच रुग्णांपैकी एक जिल्हा रुग्णालयात तर अन्य चार खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचा केवळ एकच रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत तीन रुग्ण होते. मार्च महिन्यात मात्र स्वाइन फ्लू बाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. एकट्या मार्च महिन्यात ६५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. शहरात वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचा जोर कायम
By admin | Published: April 07, 2017 2:08 AM