नाशिक : स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील रुग्णाचा सोमवारी (दि़१७) मृत्यू झाला़ राजेंद्र बारकू पागे (४५, रा. आंबेगण) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सद्यस्थितीत २२ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी आठ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत़ वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत आहे़ त्यातच गणेशोत्सवात आरास पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळेही या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली असून आतापर्यंत शहर व जिल्ह्णातील १८ जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे़ आंबेगण येथील रहिवासी राजेंद्र पागे यांच्यावर मुंबई नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ रविवारी (दि़ १६) दुपारी त्यांनाजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते़ सोमवारी (दि़१७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पागे यांचा मृत्यू झाला़ पागे यांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला ते स्पष्ट झालेले नाही़ दरम्यान स्वाइन फ्लू कक्षात २२ रुग्ण दाखल असून आठ रुग्ण पॉझिटिव्ह असून उर्वरित १४ रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.या कक्षात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये दहा महिला तर १२ पुरुष आहेत़
स्वाइन फ्लूसदृश आजाराने आणखी एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:54 AM