नाशिक : निलंबित तहसीलदारांचा पदभार न स्वीकारण्याचा निर्णय घेऊन शासनाविरुद्ध दंड थोपटणाऱ्या नायब तहसीलदार व तहसीलदारांच्या संघटनेने आपली तलवार म्यान करीत सरकारपुढे मान तुकविली आहे. सात निलंबित तहसीलदारांचा पदभार अखेर नायब तहसीलदारांनी स्वीकारला आहे. दरम्यान, निलंबनाविरुद्ध मॅटमध्ये धाव घेतलेल्या तहसीलदारांच्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. गुरुवारी मुंबईत तहसीलदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मॅटने सुनावणी करण्यापूर्वी महसूल खात्याला त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. शासनाचे या संदर्भातील म्हणणे आल्यानंतर सोमवारी सुनावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे निलंबित तहसीलदारांचा पदभार कुणीही न स्वीकारण्याचा निर्णय घेऊन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न तहसीलदार संघटनेने सोडून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न जुमानल्यास नायब तहसीलदारांवर कारवाई होण्याच्या भीतीने गुरुवारी सकाळी सातही तहसीलदारांचा पदभार निवासी नायब तहसीलदारांनी स्वीकारला. (प्रतिनिधी)
तहसीलदार संघटनेची तलवार म्यान
By admin | Published: May 22, 2015 1:47 AM