लेखानगर येथील चौफुलीवर देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात आलेला रणगाडा बसविण्याचा या परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांचा मानस होता. त्यानुसार नाशिक महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करून सामाजिक दायित्व निधीतून तो मंजूरही केला. हा रणगाडा नाशिकमध्ये दाखल होत असताना आता वाहतूक बेट साकारणारच असे वाटत असताना वादाची माशी शिंकली. प्रवीण तिदमे आणि चुंभळे कुटुंबाचा संघर्ष सुरू झाला. या जागेवर असलेलेे आरक्षण आणि त्यातच वाहतुकीला अडथळे यामुळे परिसरातील काही नागरिकांचा वाहतूक बेटास विरोध असल्याचेच निमित्त झाले. वादाचे रूपांतर न्यायालयाच्या लढाईत झाले. ही लढाई अजूनही कायम असताना आता मात्र अचानक उभयतांनी सामंजस्याची भूमिका घेतली.
प्रभागाच्या नगरसेविका कल्पना चुंभळेही शिवसेनेच्या आणि तिदमेही त्याच पक्षाचे. काही वरिष्ठांनी त्यांना समजावले. प्रभागातील सदस्यांची संख्या दोन असली तरी दोन्ही ठिकाणी या दोन्ही नगरसेवकांना उमेदवारी करण्यासदेखील अडचण नाही. मग वाद करायचा कशाला? अखेरीस दोघांनी सामंजस्यांनी घेतले. लेखानगरच्या वाहतूक बेटाचा प्रश्न त्या निमित्ताने सुटला आणि संक्रांतीच्या मुहूर्तावर या वाहतूक बेटासाठी सुशोभीकरणाचेदेखील ठरवण्यात आले आहे. म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने गेाड गोड बेालण्यास सुरुवात होणार आहे.
इन्फो..
रणगाड्यासाठी आता सेनापतींना आवतणं
लेखानगरच्या वाहतूक बेटावर रणगाडा स्थानापन्न करण्याचे काम बाकी आहे. वाहतूक बेटाच्या परिसराचे सुशोभीकरण झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक असलेला रणगाडा याठिकाणी उभारण्यात येईल आणि त्याच्या लोकार्पणासाठी पक्षाचे सेनापती तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच निमंत्रित करण्याचेदेखील ठरवण्यात आले आहे.