मालेगाव : सन २०१३ साली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमी तरुणांनी हातात तलवारी घेऊन त्याचे प्रदर्शन केले म्हणून मच्छिंद्र शिर्के, शाम गवळी, हरिप्रसाद गुप्ता, राजेंद्र शास्त्री, सतीश कजवाडकर, गितेश बाविस्कर, सोहनलाल जैन, दिलीप पिंगळे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. मात्र न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्याचे कामकाज येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तामणे यांच्या न्यायालयात सुरू होते. संशयितांच्या ताब्यात तलवार असल्याबद्दल कोणताही पुरावा न्यायालयासमक्ष पोलीस सादर करू शकले नाही. तसेच राजकीय पुढारी जाहीर सभेत सत्कार घेताना जी तलवार लोकांना मॅनमधून काढून दाखवितात, ती तलवार शोभेची असते म्हणून पोलीस राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यभिषेक दिनानिमित्त शिवप्रेमी तरुणांनी काढलेल्या मिरवणुकीत शोभेच्या तलवारी नाचविण्यात आल्या होत्या. शोभेच्या तलवारी व धार असलेल्या प्राणघातक तलवारी यामध्ये फरक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तशी बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या गुन्ह्यात नेमके कोणत्या संशयिताकडे तलवार होती व त्या तलवारीचे मोजमाप काय होते, याचा पुरावा न्यायालयासमक्ष पोलीस देऊ शकले नाही. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.