नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सोमवारी (दि.१८) दक्ष नागरिक मंच आणि मैत्रविश्व ग्रुप यांच्यातर्फे सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी सावरकरांचे विचार रसिकांसमोर मांडताना सावरकरांचे देशप्रेम आणि त्यांच्या मनात मातृभूमीविषयी असलेली ओढ याविषयी विविध प्रसंगांसह अंदमान येथील काळ््या पाण्याच्या शिक्षेदरम्यान आलेल्या अनेक कटू अनुभवही उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, कविता हे क्रांतीचे प्रतीक आहे, यावर सावरकरांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कवितांमधून मातृभूमीविषयी कायम कृतज्ञता व्यक्त होत राहिली.त्यांची कविता इतरांच्या किंवा स्वत:च्या आनंदासाठी कधीच नव्हती. त्यांची कविता ही मातृभूमीच्या रक्षणासाठी होती. त्यांच्या कवितांमधून सातत्याने राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडते. अंदमानच्या तुरुंगवासात त्यांनी अनंत यातना भोगत असतानाही कविता लिहिल्या. खडतर शिक्षा भोगत असतानादेखील ते डगमगले नाहीत. त्यांचे काव्य म्हणजे जणूकाही धगधगते अग्नीकुंडच होते़ त्यापासून अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती दिली त्यामुळेच त्यांच्या कविता त्यांनी भोगलेल्या वेदनांची सातत्याने जाणीव करून देत असल्याचेही बेदरकर यांनी यावेळी नमूद केले.
सावरकरांच्या कविता क्रांतीचे प्रतीक : बेदरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:22 AM