सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव येथे भिमा कोरेगाव येथील घटनेचे तिव्र पडसाद उमटले. दंगलीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत कडकडीत बंद पाळण्यात आला. अवघ्या दहा मिनिटातच गावातील बाजारपेठ बंद करण्यात आली. दिवसभराच्या बंदला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सायगावला घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बंदची हाक दिली. दंगलीबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याने काही काळ गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ शेकडो मुख्य रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरकारविरोधात फलक फडकवून निषेध नोंदवला. ग्रामस्थांना शांततेचे आव्हान करत प्रा. शिवाजी भालेराव, भाऊसाहेब अहिरे, संतोष खरे, भागुनाथ उशीर यांनी येथील रोकडोबा पारावर बोलावून निषेध सभेचे आयोजन केले. निषेध सभेत मालती पगारे, भाऊसाहेब अहिरे, संतोष खरे, भागुनाथ उशीर यांनी घटनेचा निषेध नोंदवत ग्रामस्थांना सामाजिक सलोखा राखण्याचे आव्हान केले. सायगावमधील बंद व तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिस उपनिरिक्षक नरेंद्र खैरनार यांनी तातडीने येवून जमावाला शांततेचे आवाहन केले.
सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, सायगावी कडकडीत बंद : भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:19 PM