नाशिक : झेंडू, आंब्याच्या पानांचे तोरण, दारी सुरेख रांगोळी, देवीची यथासांग पूजा, साग्रसंगीत नैवेद्याची लगबग, आरती, पाटी-पुस्तकांसह सरस्वतीची पूजा, शस्त्रास्त्रे-यंत्रांची पूजा, सुग्रास भोजनासह उपवासाची समाप्ती, गाडी-सोने-गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, सायंकाळी आपट्याच्या पानांसह सोनरी शुभेच्छांची देवाणघेवाण, देवदर्शन, रावणदहन, देवीला साश्रुनयनांनी निरोप अशा मंगलमय वातावरणात नाशिककरांनी विजयादशमी साजरी केली. यंदा झेंडूचे भरघोस पीक आल्याने नाशिककरांना मुबलक प्रमाणात झेंडूची फुले उपलब्ध झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून आली. अनेकांनी शनिवारी सकाळीही फुले, आपट्याची पाने, पूजा साहित्य, गोड पदार्थ आदी खरेदी करण्यावर भर दिला होता. विद्यार्थ्यांनी पाटीवर सरस्वती काढत पुस्तके, वह्या यांचे गंधाक्षता, फुले वाहून पूजन केले. कारखाने, फॅक्टरींमध्ये यंत्रांचे तर पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. महिलावर्गाची पहाटेपासून सडा-रांगोळी, फुलांचे तोरण, गाड्यांना हार, पूजेची तयारी, स्वयंपाक अशी लगबग होती. अनेक घरी नवरात्रीनिमित्त नऊ दिवस उपवास करण्यात आले होते. दसºयाच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवित उपवासाची सांगता करण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाºया विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी नवनवीन साहित्याची खरेदी करण्यावर भर दिला. सत्याचाअसत्यावर विजय या संकल्पनेतून दसरा अपार उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक स्नेही आदींकडे जाऊन सोन्याचे प्रतीक असणाºया आपट्यांची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या. सायंकाळी देवदर्शनासह सीमोल्लंघनाहून परतल्यावर ज्येष्ठ सदस्यांचे, वाहनांचे औक्षण करण्यात आले.कालिकेचे दर्शन, महापूजेला गर्दीग्रामदैवत कालिका देवी मंदिरात शनिवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी, सोने वाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी मंदिर आवारात शस्त्रास्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर वास्तुविशारद संजय पाटील, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाणे, डॉ. प्रदीप पवार आदि मान्यवरांच्या हस्ते मंदिरात देवीची महापूजा, आरती करण्यात आली. दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत देवीला सोनेरूपी आपट्याची पाने वाहत आशीर्वाद घेतला. सीमोल्लंघनाच्या परंपरेचे पालन करीत मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीची दर्शन घेतले.
हर्षोल्हासात सीमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:13 AM