नाशिक : प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली. गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या वतीने पहाट पाडवाअंतर्गत पद्मजा फेणारी -जोगळेकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीच्या प्रारंभी ‘उषा सुक्त ओठात ओथंबले’ हे गीत सादर केले आणि पद्मजा यांनी जणू सुरांच्या मैफलीची नांदी सादर केली. ‘सोनं चाफ्यांची पावलं, दारा बांधता तोरण, अंगणी अंगणी ही कविता फेणाणी यांनी सादर करून दिवाळी कशी सोनं चाफ्याच्या अलवार पावलानं आली याची अनुभूती रसिकांना दिली. प्रख्यात गजलकार कै. सुरेश भट यांच्या ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली..’ या दुर्गा रागातील गीताने मंगलमय वातावरणातील पहाटेचे स्वागत केले अन् इंदिरा संत यांच्या ‘या हो या सूर्यनारायणा’ गीताने उगवत्या सूर्याला सुराचे अर्घ्य दिले.रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत अनेकविध गीते सादर करणाऱ्या पद्मजा यांनी ‘कान्हा कैसे खेलू तुजबीन होली’, विंदा यांची प्रसिद्ध गजल ‘सांगू कसे सारे तुला.. कुसुमाग्रजांचे ‘हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या गीतासह रु णुझुणु रु णुझुणु रे भ्रमरा , ‘लव लव करी पात या सादर केलेल्या गीतांंना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.प्रमुख अतिथींचे स्वागत आमदार देवयानी फरांदे व पक्षाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महिला व बाल कल्याण विभागाच्या राज्य सचिव विनीता सिंगल, आमदार अनील कदम, महापौर रंजना भानसी, पोलीस अधिकारी हरीश बैजल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, सुरेश पाटील, बाबासाहेब दातार, अॅड. नितीन ठाकरे, समीर शेटे, योगेश हिरे, हिरामण आहेर, कौशल्य विकासचे संपत चाटे आदी उपस्थित होते. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक स्वाती भामरे यांनी आभार प्रदर्शन केले.अटलजींच्या निवडक रचना केल्या सादरअटलजींच्या कविता स्वरसाज चढविण्याचे काम फेणाणी यांनी केले असून, त्यातील निवडक रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांना अटलींच्या काव्यप्रतिभेचे स्मरण करून दिले. अटलजींचे रोती रोती रात सो गई... ही कविता राग अभोगीत सादर करीत ‘आज सुनी पिया’ या बंदिशीची जोड त्यांनी दिली. ‘आज जाने की जिद ना करो..’, ‘तन मन हिंदू...’, ‘गीत नया गाता हूॅँ...’अशा अटलजींच्या अनेक कविता त्यांनी सादर केल्या. त्यांना विजय तांबे, मनोज देसाई, नागेश भोसेकर, जयंत पवार, सोनाली बोरकर, त्रिभुवन पटवर्धन यांनी साथसंगत दिली.
श्रवणीय गीतांनी सजली पद्मजा फेणाणी यांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:04 AM