लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवाजी नगरच्या जनता विद्यालयात आयोजित ट्वेन्टी-२० चषक स्पर्धेत नाशिक जिमखाना संघाने प्रतिस्पर्धी आरडीसीसी क्लब संघावर दणदणीत १० गडी राखून विजय मिळवला.
या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. स्पर्धेच्या अंतिम सामना नासिक जिमखाना व आरडीसीसी क्लब यांच्यात झाला. अंतिम सामन्यांत नाणेफक आरडीसीसी संघाने जिंकला व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नासिक जिमखाना संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणासमोर त्याचा डाव २२ धावांमध्ये गारद झाला. जिमखाना संघांकडून रितेश तिडके याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत ४ षटकामध्ये फक्त ११ धावा देत ४ बळी गारद केले. त्याला आकाश बोरसेने ४ धावात २ बळी, रोशन वाघसरेने ६ धावात २ बळी व हुजेफ शेख याने एक ही धाव न देता २ बळी बाद केले.
जिमखाना संघाला जिंकण्यासाठी २३ धावांची आवश्यकता असताना जिमखाना संघाकडून रितेश तिडके व यश पगार या आघाडीच्या जोडीने फक्त दीड षटकामध्ये नाबाद विजयी धावसंख्या गाठली. यामध्ये रितेश तिडके याने घणाघाती फलंदाजी करत ९ चेंडूंमध्ये ३ षटकार व १ चौकारच्या मदतीने २२ धावा काढल्या त्याला यश पगार याने ५ धावा करून उत्तम साथ दिली.
या स्पर्धेचा उत्तम खेळाडू तसेच उत्तम गोलंदाज व अंतिम सामन्याचा मानकरी म्हणून जिमखाना संघाच्या अष्टपैलू खेळाडू रितेश तिडके याला गौरविण्यात आले. बक्षीस समारंभ नगरसेवक राहुल दिवे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी विजयी संघास चषक देऊन गौरविण्यात आले. जिमखाना संघाला प्रशिक्षक संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. जिमखाना संघाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, संस्थेचे सचिव राधेश्याम मुंदडा, कार्याध्यक्ष नितीन चौधरी, सहसचिव शेखर भंडारी तसेच क्रिकेट गेम सेक्रेटरी अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड व झुलकर जहागीरदार यांनी अभिनंदन केले.