नांदगांव : कागदपत्रांची पूर्तता करताना गोरगरिबांची दमछाक होत आहे. त्यांना कागदपत्रांची व्यवस्थित माहिती नसते. तालुक्यातील बोलठाण -जातेगाव परिसर नांदगावपासून दूर आहे. त्याठिकाणीसुद्धा असे अभियान राबविण्याची गरज आहे. अभियान कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांनी योजनांची माहिती घेऊन शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचवावी, असे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी केले. नांदगाव येथे दोन दिवसीय महाराजस्व अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. येथील सावता माळी कंपाउंडमध्ये अभियानाला सुरुवात झाली. आमदार पंकज भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी भीमराज दराडे, सुहास कांदे, सुमन निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, सुभाष कुटे आदी उपस्थित होते.बँक, पोलीस ते सेतूपर्यंत विविध दालने येथे आहेत. शासकीय योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता यावी यासाठी हे अभियान राबविण्यास येत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. अभियान राबविण्यात सहा महिने उशीर का झाला, याविषयी माहिती दिली. प्रशासनाने आॅनलाइनमधील तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रांताधिकारी दराडे यांनी अधिकारी व मजूर यांच्या पगाराची तुलना करून पगाराच्या रकमेच्या पटीत अधिकारी काम करतात का, असा प्रश्न करून आत्मचिंतनाचा सल्ला दिला. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी प्रास्ताविक केले. येथील पंचायत समिती व नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत. अशा विरोधी पक्षातील प्रत्येक प्रतिनिधीला या व्यासपीठावरून विचार मांडण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. प्रत्येक प्रतिनिधीने आपापल्या पक्षाची बाजू मांडून विरोधी पक्षावर प्रश्नांचा भडिमार केल्याने अभियानासाठी आलेल्या जनतेची करमणूक झाली. छत्रपती जनसेवा मंडळाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केल्याची माहिती प्रशांत शर्मा यांनी दिली. याप्रसंगी दत्तराज छाजेड, संतोष गुप्ता, राजाभाऊ जगताप, गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक कुलधर, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे, मुख्य अधिकारी विश्वंभर दातीर, जि.प. सदस्य आशा जगताप, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. सचिन साळवे यांनी केले.
कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 9:07 PM