नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला शाकीर सुलेमान शेख उर्फ घाऱ्या ( २३, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) याला पोलिसांनी शनिवारी (दि.२२) भद्रकाली परिसरातून ताब्यात घेत त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सागर प्रदीप निकुंभ यांनी घाऱ्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार घाऱ्याला नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्याविरोधात शांतता भंग करणे, हाणामारी प्राणघातक हल्ला करण्यारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर नाशिक शहर पोलिसांनी कारवाई करून शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असताना तो मूदत संपण्यापूर्वीच पोलिसांची परवानगी न घेता भद्रकालीतील गंजमाळ, पंचशीलनगर भागात पोलिसांना रविवारी (दि.२२) आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस नाईक एस.व्ही. शेळके अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"