नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, धरणांमध्ये पाणी असूनही पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी पाणी देण्यास नकार देत असल्याने ग्रामस्थांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. सध्या पूनद धरणात ९० टक्के इतके पाणी शिल्लक असून, ते पूनद नदीपात्रात तसेच सुळे डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून सोडल्यास चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी पाटबंधारे खात्याने धरणाच्या मोरीत लाकडे अडकल्याचे निमित्त करून धरणातील पाणी पूर्णपणे संशयास्पदरीत्या सोडून दिले होते. आता मात्र गावकऱ्यांकडून मागणी होत असताना पाणी दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून या चौदा ग्रामपंचायतींचे सरपंच व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी कळवण पंचायत समितीचे सदस्य केदा ठाकरे, कौतिक गांगुर्डे, संजय शेवाळे, मनोहर शेवाळे, केदा बहिरम, संदीप वाघ, प्रल्हाद जाधव, भरत अहेर, राजेंद्र भामरे आदिंनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
चौदा ग्रामपंचायतींचा पाण्यासाठी टाहो
By admin | Published: April 07, 2017 1:24 AM