ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीवेळी झालेल्या चार बिनविरोध निवडीनंतर तेरा जागांसाठी तब्बल ३१ उमेदवारांनी आपले नशीब निवडणूक रिंगणात आजमावले. यात सत्ताधारी गटाच्या श्री गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या मात्र बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आहेत. त्यामुळे या ठिकाणी सत्तेसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे.
अतिशय अटी-तटीच्या लढतीत निवडणूक झाली. वॉर्ड क्रमांक १ मधून अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी निखिल राजेंद्र कासारे, महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी प्रमिला सुभाष नंदन, सर्वसाधारण जागेसाठी डॉ. नितीन विजय पवार हे विजयी झाले.वॉर्ड क्रमांक दोनमधून अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी जीवला दलपत माळी, अनुसूचित जमाती महिला जागेसाठी भारती अजय सोनवणे हे विजयी झाले. या वॉर्डात महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी शीतल योगेश नंदन बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक तीनमधून महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी कल्पना सुनील जाधव व अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी यशवंत लक्ष्मण पवार दोन्ही बिनविरोध निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी भाग्यश्री किशोर साळवे यांनी आपल्या आत्या वंदना वसंत नंदन यांचा पराभव केला.
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर तुषार नामदेव अहिरे विजयी झाले. गावात लक्ष्यवेधी ठरलेल्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर माजी सरपंच सीताराम तुकाराम साळवे यांनी त्यांचे पुतणे माजी सरपंच संदीप मधुकर साळवे, मिलिंद सुधाकर चित्ते, जगदीश साळवे यांचा पराभव केला. सर्वसाधारण जागेसाठी दोन्ही कांकरिया बंधूंमध्ये झालेल्या लढतीत निलेश सुभाष कांकरिया यांनी माजी उपसरपंच प्रदीप कांतीलाल कांकरिया यांचा पराभव केला. महिला सर्वसाधारण जागेसाठी शोभा अशोक कांकरिया विजयी झाल्या.वॉर्ड क्रमांक सहामधून अनुसूचित जमाती महिला जागेसाठी जिजाबाई मुरलीधर वनिस, अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी राजेश सजन माळी, महिला सर्वसाधारण जागेसाठी प्रीती सचिन कोठावदे विजयी झाल्या.सरपंच आरक्षणाकडे लक्षनिवडणूक झालेल्या तेरा जागांपैकी सत्ताधारी गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागांवर विजय मिळविता आला आहे. चार बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आता सत्तेच्या चाव्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले चार सदस्य कशी भूमिका बजावतात, यावर सत्तेचे समीकरण ठरणार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार असून, सरपंचपदाच्या आरक्षणाकडेही लक्ष लागून राहिले आहे.