नाशिक : ताई माई अक्का, विचार करा पक्का.. किंवा येऊन येऊन येणार कोण... अशा अनेक घोषणा निवडणुकांमध्ये दणाणून जात. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अशाप्रकारच्या घोषणा नाही की रिक्षातून प्रचार नाही... आले आले आले, आपले उमेदवार किंवा जाहीर सभेला मोठ्या संख्येने हजर व्हा, असेही नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील शांतता चर्चेचा विषय ठरली आहे.लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. माध्यमांमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सोशल मीडियावरदेखील पोस्ट व्हायरल होत आहेत. परंतु त्या तुलनेत पारंपरिक प्रचार ठप्प झाला आहे. पूर्वी निवडणुका म्हटल्या की प्रचाराची राळ उडत असे. रिक्षा किंवा अन्य चारचाकी मोटारीवर पक्षाचे चिन्ह उमेदवाराच्या छबी आणि ध्वनिवर्धकावर ताई माई अक्का, विचार करा पक्का, अमुक अमुक वर मारा शिक्का अशा प्रकारच्या घोषणा हमखास दिल्या जात असे. दिवसभर गल्लीबोळातून फिरणाऱ्या या रिक्षांवरील प्रचार कित्येकदा असह्य होत असे. परंतु त्यामुळे निवडणुकीचे वातावरण टिकून असे. एखाद्या भागात उमेदवाराने रॅली काढली तरी त्यापुढे धावणारी रिक्षा, आले आले आले, आपले लाडके उमेदवार आले अशी वर्दी देत असे.निवडणूक काळात नेत्यांची प्रचारसभा असली की, त्याची वर्दीदेखील अशाप्रकारे रिक्षातील प्रचारावरून दिली जात असे. आज सायंकाळी ठीक अमुक वाजता अमुक अमुक मैदानावर प्रचंड संख्येने उपस्थित राहा असे आव्हान केले जात असे. परंतु आता प्रचाराची पद्धती बदलली. आता प्रचार प्रत्यक्षात कमी आणि सोशल मीडियावर अधिक होऊ लागला आहे.या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराची रिक्षा सोडली तर अन्य प्रमुख पक्षांच्या म्हणजे युती किंवा आघाडीच्या रिक्षाच नाहीत. या दोन्ही पक्षांचे रथ आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे तर सहा विधानसभा मतदारसंघात सहा रथ आहेत. राष्टÑावादीचासुद्धा रथ आहे. तोदेखील विविध भागांत फिरत असतो. परंतु पूर्वीसारखा प्रचाराचा गलका जाणवत नाही, त्यामुळे सारे कसे शांत शांत असे वातावरण दिसत नाही. अनेकदा तर निवडणूक आहे किंवा नाही अशीदेखील शंका उपस्थित केली जाते, इतकी शांतता आहे.उमेदवार थेट मतदाराच्या कानापर्यंतउमेदवाराच्या प्रत्यक्ष भेटी ही पूर्वी प्रचारासाठी वैशिष्ट्यहोते. परंतु आता मात्र मोबाइलवर अनोळखीक्रमांकावरून फोन येतो आणि तो कॉल घेतला की, थेट उमेदवाराची आॅडिओ क्लिप सुरू होते आणि तो मतदानाचे आव्हान करतो.काही प्रमुख अपक्ष उमेदवारांनी शहरातील अधिकृत होर्डिंग्जवर प्रचार केला आहे. युतीच्या उमेदवाराच्या तर मोठ्या तीन चाकी सायकलींप्रमाणेच जाहिरात सायकलींवर प्रचार सुरू आहे. परंतु, एकीकडे व्हॉट्््सअॅप, फेसबुकवर हायटेक पारंपरिक पद्धत अंमलात आणल्या जात असताना दुसरीकडे मात्र असा पारंपरिक प्रचारदेखील होत आहे.पूर्वी रिक्षा किंवा ध्वनिक्षेपकावरून होणाºया प्रचारामुळे वातावरण ढवळून निघत असे. पारंपरिक उमेदवाराच्या घोषणादेखील सर्वांच्या तोंडपाठ होऊन जात. वेगवेगळ्या घोषणा लयबद्ध पद्धतीने दिल्या जात असल्याने त्या लक्षात राहायच्या. परंतु आता मोबाइलसारख्या हायटेकपद्धतीचा वापर केल्याने जुन्या पद्धतीचा प्रचार मागे पडत चालल्याचे दिसत आहे.- सुभाष पंचाक्षरी
ताई, माई, अक्का... प्रचार पडला फिक्का!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:07 AM