पंचवटी : शनिवारी जंगलीदास महाराजांच्या शाही आत्मा स्नान मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी खुद्द आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी केली आहे. जंगलीदास महाराजांच्या आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे शनिवारी शाही आत्मा स्नान मिरवणूक काढण्यात आली होती. तपोवन साधुग्राम रस्त्याने ही मिरवणूक जात असताना तीन अनि आखाड्यांच्या साधू-महंतांनी सदर मिरवणूक आखाड्यांच्या नियमाच्या बाहेर असून, आखाड्यांची परवानगी नसल्याने वाद घालून आत्मा मालिक ध्यानपीठाच्या समर्थकांवर लाठ्या, काठ्यांनी हल्ला चढविला होता तसेच हातात दानपट्टे व तलवारी घेऊन साधूंनी ध्यानपीठाच्या समर्थकांवर चाल केल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर मिरवणूक मार्ग बदलल्यानंतर हा वाद मिटला होता. याबाबत महंत ग्यानदास यांनी प्रसिद्धीमाध्यमांना लेखी पत्र देऊन घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत या घटनेने साधूंविषयी वाईट संदेश गेल्याने दोषींची गय न करता कडक कारवाईची मागणी केली आहे. गंगापूजनासाठी निघालेली मिरवणूक साधुग्राममध्ये आली असता त्यावर हल्ल्याची चिथावणी दोन तीन महंतांनी दिली त्यामुळेच वाद झाला होता. मिरवणुकीसाठी आखाड्यांची परवानगी नसेल तर हा वाद सामोपचाराने मिटविणे गरजेचे होते. सिंहस्थात अडथळा आणण्याचे काम एका आखाड्याचे काही लोक सतत करत आहेत आणि त्यांनीच हे वाईट कृत्य केले असे सांगून घटना घडली तेव्हा आपण साधुग्रामबाहेर होतो, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
मिरवणूक अडविणाऱ्या दोषींवर कारवाई करा
By admin | Published: September 07, 2015 11:56 PM