हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:07 PM2019-02-04T18:07:26+5:302019-02-04T18:07:57+5:30
३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी शौर्य दिवस साजरा केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली वाहिली जात असताना अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विकृत कृत्याने देशाची मान शरमेने झुकवल्याचा आरोप करून सोमवारी कॉँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी शौर्य दिवस साजरा केला जातो. मात्र विकृत कार्यकर्त्यांनी वरील संबंधित प्रसंग पुनर्जीवित करण्याचा घाट घातला जातो हे दुर्दैवी असून, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास गोळ्या घातल्या हे कृत्य देशाला घातक आहे. अशा लोकांना अटक करून देशामध्ये लोकशाही आहे. हुकूमशाही नाही हे सरकारने सिद्ध करावे. तसेच विध्वंसक मनुवृत्तीच्या विचाराच्या लोकांचा देशामध्ये पुन्हा हिंसा घडवण्याचा हा अप्रत्यक्षरीत्या दाखविण्याचा डाव आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, शहर अध्यक्ष शरद आहेर, हेमलता पाटील, विजय राऊत, ज्ञानेश्वर काळे, सुनील आव्हाड, लक्ष्मण जायभावे, मीरा साबळे, सुरेश मारू, राजकुमार जेफ, नीलेश (बबलू) खैरे, कैलास कडलग, विजय पाटील, उद्धव पवार, उत्तम भोसले, संतोष ठाकूर, अण्णा मोरे, रोहन कातकाडे, जितेंद्र बराथे, अशोक रोडगे आदी उपस्थित होते.