मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करीत नाही. जनतेचे धान्य लुटणाऱ्यांवर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करू, असा इशारा आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी दिला. यावेळी इस्माईल यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुफ्ती यांनी मे महिन्यात प्रांत शर्मा यांना निवेदन दिले होते व कारवाईची मागणी केली हाेती. यानंतर दुकानदारांना नियमानुसार धान्य वाटपाच्या सूचना करण्यात आल्या हाेत्या. मात्र, काही दुकानदारांचा धान्य काळबाजार सुरू असल्याने मुफ्ती यांनी आढावा घेत धान्य वितरण कार्यालयाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. शासन जनतेला माेफत धान्य देत आहे. तरीही अनेक नागरिकांना माेफतचे धान्य उपलब्ध हाेत नाही. शहरात १३० रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप केले जाते. १५ हजार अंत्याेदय तर २८ हजार बीपीएल कार्डधारक आहेत. शासनाकडून दरमहा या लाभार्थ्यांसाठी धान्य प्राप्त हाेते. मात्र, त्यांना लाभानुसार धान्य दिले जात नाही. पिवळ्या शिधापत्रिका धारकांना साखरेचे वाटपच हाेत नाही. धान्याची ऑनलाईन पावती दिली जात नाही. दुकाननिहाय धान्य वाटपाची चाैकशी करून जबाबदार दुकानदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुफ्ती यांनी प्रांत शर्मा यांना दिल्या. बैठकीस प्रभारी धान्य वितरण अधिकारी पी. बी. माेरे, कार्यालय अधीक्षक विजय खरे आदी उपस्थित हाेते.
---------------
मालेगावी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धान्य वितरणाचा आढावा घेताना आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल. (०१ मालेगाव धान्य)
010721\01nsk_15_01072021_13.jpg
०१ मालेगाव धान्य