निफाड : काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे गावपातळीवरील अनेक विकासकामे रखडून पडतात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा तसेच शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी नम्रतेने बोलून त्यांची कामे तत्काळ मार्गी लावा, अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांनी निफाड येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीप्रसंगी केल्या. याप्रसंगी बनकर यांनी निफाड तालुक्यातील आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा जाणून घेतला. तालुक्यात कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या १९,०९६ इतकी झाली असून, त्यापैकी १८,३०८ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज रोजी गृह विलगीकरणातील ७५ रुग्ण मिळून एकूण १०१ रुग्ण कोरोना बाधित आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना बनकर यांनी दिल्या. लसीकरणात तालुक्याचा अव्वल क्रमांक असल्याबाबत कौतुक करतांना आरोग्य विभागाला लसीकरण करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर तत्काळ तोडगा काढून लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात राबवण्यात यावे, अशा सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुसज्ज वसाहतींसाठीचे प्रस्ताव सादर केले असून, लवकरात लवकर वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे, अशीही माहिती बनकर यांनी दिली.
याप्रसंगी प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे, तालुका कृषी अधिकारी बटू पाटील, बांधकाम विभागाचे अर्जुन गोसावी, आदिवासी विभागाचे सूर्यभान सुडके, तालुका भूमी अभिलेखचे संधान, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे अशोक रहाटे, पिंपळगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, सायखेडा पोलीस उपनिरीक्षक पप्पू काद्री उपस्थित होते.