सिन्नर : सिन्नर शहरासाठी कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची कडवा ते फिल्टर व फिल्टर ते शहरातील जलकुंभांपर्यंत हायड्रोलिक टेस्टिंग करावी. त्यानंतर महिनाभर ट्रायल घेऊन त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय नगर परिषदेने योजना ताब्यात घेऊ नये, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सिन्नरनगर परिषदेची २४ तास पाणीपुरवठा योजना गेली अनेक वर्षे रखडली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून साकार होत ही महत्त्वाकांक्षी योजना सिन्नरकरांना पुढील अनेक वर्षे नवसंजीवनी ठरणार आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना गेली पाच वर्षे वीज कनेक्शनअभावी रखडलेली होती. कोकाटे यांच्या शिष्टाईमुळे वीजजोडणीसाठी लागणार्या ११ केव्ही वीजवाहिनीचे ४० खांब जानेवारी महिन्यामध्ये एका दिवसात आम्ही उभारून घेतले. तद्नंतर काही दिवसांतच वीजवाहिन्या टाकण्यात आल्या. फक्त कनेक्शन करायला पाच महिन्यांचा कालावधी सत्ताधाऱ्यांना लागला ही हास्यास्पद बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आमदार माणिकराव कोकाटे आदींना माहितीसाठी पाठविली आहे.