डासांमुळे नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील काही भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागात वेळच्या वेळी धूर फवारणी होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही भागात धूर फवारणीची मोठी गाडी जात नसल्याने तेथे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नाशिक : सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी राहत असल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला असून, मागील दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. काही दुकानांमध्ये नियमांचे पालन केले जात असले, तरी अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे समस्या
नाशिक : नाशिकरोडच्या बिटको चौक परिसरात रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा या ठिकाणी छोटेमोठे अपघातही होतात. यातून वाहनचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडतात. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वाहतुकीला अडथळा
नाशिक : नाशिकरोड येथे शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावर बसणारे विक्रेते, याच ठिकाणी उभ्या राहणाऱ्या रिक्षा यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. दिवसभरातून अनेकवेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. याबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.