सध्या या तिन्ही आजारांचा एकत्र काळ आल्याने शहरात किमान पंधरा ते वीस रुग्ण हे तिन्ही एकत्रित आजार असलेले आढळले आहेत. सुदैवाने सर्व रुग्ण बचावले असले तरी, काळजी घेण्याची गरज आहेच. तिन्ही आजारात सुरुवातीला ताप येत असला तरी, कोरोनामध्ये नंतर वेगळे संसर्ग आढळतात. डेंग्यू झालेल्यांच्या रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स कमी हाेतात. अंगावर रॅशेस येतात, तसेच प्रसंगी नाका-तोंडातून रक्तस्त्राव होतो. तसेच चिकुनगुन्यामुळे हात-पाय दुखतात. अर्थात गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा चिकुनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काेरोना निर्बंधामुळे बंद असलेले अनेक कारखाने अलीकडेच उघडले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पाणी साचले. तसेच अनेक परप्रांतीय कामगार हे परत गावी गेल्याने त्यांच्या घराच्या छतावर आणि परिसरात देखील पाणी साचलेले आहे, त्यामुळे या भागात डासांची उत्पत्तीस्थाने आढळत असल्याचे महापालिकेच्या पथकाला आढळत आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये डेंग्यूचे रुग्ण ११२६ इतके होते. त्यावेळी डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने खासगी डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतले होते. कोरोनामुळे इतकी तीव्रता गेल्यावर्षी जाणवली नाही. गेल्यावर्षी अवघे ३३७ रुग्ण आढळले होते. यंदा मात्र, १९८ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सुदैवाने रुग्णसंख्या अजूनही मर्यादित आहे. गेल्या काही वर्षांत डेंग्यू उपचारांबाबत जागृती झाल्याने मृत्यूचे प्रमाण नगण्य किंबहुना नाहीच. चिकुनगुन्यात मृत्यू हाेत नाही, त्यामुळे ती देखील अडचण नाही. मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
नाशिक महापालिकेच्यावतीने ३६ पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांचे वॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांची तत्काळ माहिती मिळते आणि मनपाचे पथक संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासून तत्काळ रुग्णांच्या घराचा परिसर रेड झोन म्हणून ठरवतात आणि त्यानंतर पुढील उपाययोजना करतात. मात्र अशी वेळ येऊच न देणे हे नागरिकांच्या हातात आहे. त्यामुळेच पाणी साचू देऊ नये, तसेच लक्षणे असल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका