नाशिक : पंजाब येथे रावणदहन आणि त्यानंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यात दंग असलेल्या प्रेक्षकांचा रेल्वेने घेतलेला बळी आणि एकूणच फटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता याविषयासह इतर अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकतानाच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही केले. त्यांच्याशी साधलेला हा संवादप्रश्न : फटाकेमुक्त अभियान अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवित आहे. तो काय कार्यक्रम आहे?उत्तर : गेल्या १८ वर्षांपासून महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान शाळा, महाविद्यालये व इतर अनेक ठिकाणी राबवित आहे. यात पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट आदींद्वारे फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. विद्यार्थ्यांना फटाके वाजवूच नका, असे सांगितले तर ते ऐकणार नाही पण त्यांना फटाक्यांचे प्रमाण कमी कमी करत जा, सुरसुऱ्या, कमी आवाजाचे फटाके फोडा असे सांगितले जाते. त्यातून त्यांची जाणीव वाढत जात आहे. फटाक्यांचे पैसे वाचवून त्यात इतर अनेक चांगल्या गोष्टी करता येतील, हे सांगितले जात आहे. मुलांना ते पटत आहे.प्रश्न : फटाक्यांमुळे काय आणि कसे परिणाम होतात?उत्तर : फटाके ही आपली संस्कृती नाही. ती चीनकडून आलेली आहे. आपली संस्कृती ही दिवे लावून, दीपोत्सव साजरा करण्याची आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्मचिकित्सा करू इच्छिते. जे कालबाह्य झाले आहे ते काढून टाकले पाहिजे, असा आग्रह धरला जातो. फटाक्यांच्या बाबतीतही हे लागू होते. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे लहान मुले, वयोवृद्ध, आजारी लोक यांना त्रास होतो. वायूप्रदूषण तीव्र होते. दिवाळीच्या काळात या फटाक्यांमुळे बºयाच लोकांना अस्थमाचा त्रास होतो. त्यांच्या श्वसनाला अडथळा निर्माण होतो. लोक आजारी पडतात. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवाळीत लाखो-करोडो रुपयांचे फटाके विकत घेऊन फोडतो. म्हणजे आपण लाखो-करोडो रुपये जाळतो. पैशांचा धूर करतो. या गोष्टीही लक्षात घेतल्या पाहिजे.प्रश्न : फटाके बनविणाºयांच्या आरोग्यावरही परिणाम होतो, त्याबद्दल काय सांगाल?उत्तर : उत्तर प्रदेश, तामिळनाडू अशा अनेक भागात फटाके तयार होतात. महाराष्टÑातही काही ठिकाणी फटाके तयार केले जातात. फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून, स्फोट होऊन मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाणही मोठे आहे. दरवर्षी या घटना घडतात. या व्यवसायात बालकामगारांचा भरणा अधिक असतो. बालकामगार स्वस्तात मिळतात म्हणून त्यांना राबवून घेतले जाते. या प्रकाराने त्यांचे बालपण आपण जाळत असतो. फटाके बनवणाºयांना कॅन्सर, अस्थमा, श्वसनाचे विकार, त्वचारोग असे अनेक आजार होतात. गर्भवती महिलांच्या बाळांवर परिणाम होतो. हे सारे पाहिल्यानंतर आपल्याला फटाक्यांचा इतका सोस का असावा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.प्रश्न : यंदाच्या दिवाळीत या विषयाची जनजागृती कशी करणार आहात?उत्तर : गेल्या १८ वर्षांपासून अंनिस फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनजागृतीचे काम करतेच आहे. यंदा दिवाळी साजरी करताना ‘फटाक्यांना दूर ठेवत विवेकाचे भान बाळगुया’ या संदेशावर भर दिला जाणार आहे. फटाके न खरेदी केल्यामुळे वाचलेल्या पैशात पुस्तके, खेळणी आणि इतर अनेक गोष्टी घेता येतील, हे मुलांना पटवून दिले जाणार आहे. फटाक्यांचे वाचलेले पैसे आदिवासी पाड्यांवर जाऊन, त्यांना भेटवस्तू देऊन वेगळा आनंद मिळवू शकतो हे मुलांना आणि पालकांना सांगत आहोत. प्रदूषणमुक्त दिवाळी, आरोग्यदायी दिवाळी हा संदेश सर्वांच्या मनावर ठसविला जाणार आहे.
फटाक्यांना दूर ठेवत विवेकाचे भान बाळगू : महेंद्र दातरंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:52 PM
फटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा
ठळक मुद्देफटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा फटाके ही आपली संस्कृती नाही. ती चीनकडून आलेली आहे.