नाशिक : अंजनेरीच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत प्रस्तावित चौदा किमीचा रस्ता तयार करण्याच्या हालचाली सुरु होताच नाशिककरांसह अन्य शहरांमधूनही कडाडून विरोध होऊ लागला आहे. रस्त्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घेतला जावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांना शुक्रवारी (दि.23) निवेदनांद्वारे साकडे घातलेङ्घअंजनेरीगडाचे क्षेत्र जैवविविधतेने नटलेले समृद्ध संवर्धन राखीव वन म्हणून राज्य सरकारने 2017साली घोषित केले आहे. या वनाचे संवर्धन पर्यटनाला वाव देण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे, यामुळे या वनाला मोठ्या प्रमाणात बाधित करणारा संभाव्य प्रस्तावित रस्ता करण्याचा अट्टाहास सोडावा, अशी मागणी आपलं पर्यावरण संस्था, नेचर कॉन्सझर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक, निसर्गभान संस्था, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघ, शरण संस्था, इको-एको फाउंडेशन, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, आम्ही मालेगावकर, गिव्ह फाउंडेशन आदींच्या वतीने देण्यात आलेले निवेदन प्रतिनधिक स्वरूपात अंजनेरी येथील जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या प्रा.जुही पेठे, वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी दिले.
यावेळी पेठे यांनी गोडसे यांना अंजनेरी हे केवळ एक गड नाही ते समृद्ध जैवविविधता जोपासणारे जिल्ह्याचे वैभवशाली राखीव वन आहे. या वनात अशा काही औषधी वनस्पती आहेत की त्या केवळ येथेच आढळून येतात. जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोडसे यांनीदेखील मी निसर्गाच्या विरोधात नाही, मात्र विकास करण्यासाठी रस्ताही गरजेचा असल्याचे सांगितले. यावेळी जो सध्याच्या रस्ता आहे तो निम्या गडापर्यंत जातो तो अधिक चांगला करुन शाश्वत विकासाची कास धरावी असे गायकवाड यांनी यावेळी नमूद केले. यावेळी याबाबत नक्कीच फेरविचार करु आणि सविस्तर चर्चा सर्वांना सोबत घेऊन करण्याचे आश्वासन गोडसे यांनी दिले. निवेदनांवर विविध स्वयंसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.