मालेगाव महानगरपालिकेत आयोजित सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, पोलीस उपअधीक्षक प्रवीण जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे यांच्यासह तक्रारदार रामदास बोरसे, महसूल, महानगरपालिका व भूमिअभिलेख विभागातील प्रमुख उपस्थित होते.
कोरोनावर मात करून मालेगाव शहराने नावलौकिक मिळवत मालेगाव पॅटर्न तयार केला आहे, मात्र गेल्या काही दिवसांतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या त्रिसूत्रीचा अंमल करावा. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येत गर्दी होईल, असे समारंभ टाळण्यात यावे. लग्नसमारंभात शासनाच्या नियमानुसार अधिक गर्दी केल्यास आयोजकांसह मंगल कार्यालयाच्या मालकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच लसीकरणासाठीही आरोग्य प्रशासन झटत असून जिल्हाभरात जवळपास ३५ हजार लसीकरण झाले आहे. यामध्ये कुणालाही त्याचा विपरीत परिणाम झालेला नाही. लसीकरण हे पूर्णत: सुरक्षित असून लवकरच सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यावेळी केले.