नाशिक - ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नसेल त्यांनी पुढील आठ दिवसांत लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यांना रेशनवर मिळणारे धान्य बंद केले जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. हा निर्णय केवळ नाशिक जिल्ह्यापुरताच नव्हे तर आवश्यकता वाटल्यास राज्यातही हाच निमय लागू केला जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी काेरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर निर्बंध लावावेच लागतील, असा इशारादेखील भुजबळ यांनी दिला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपचार असल्याने लस घेण्याचे राहून गेलेल्यांनी तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तर शासकीय कार्यालयांमध्येदेखील ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांनी अजूनही लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांना प्रसंगी रेशनवरील धान्य दिले जाणार नाही. मात्र पुढील आठ दिवसांत त्यांनी लसीकरण करून घेणे अपेक्षित आहे.
यात्राही भरणार नाहीत
गर्दीवर नियंत्रण असावे म्हणून यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या यात्रा, जत्रांवर निर्बंध असणार आहे. गर्दी होऊ नये यासाठी संबंधित देवस्थान, मंदिर ट्रस्टनेदेखील नियोजन करणे अपेक्षित असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मंदिरांमध्ये गर्दीवर नियंत्रण असावे यासाठीची उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सध्या ५९२ मेट्रिक टन ऑक्सिजन
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ऑक्सिजनचा ५९२ मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असून, आणकी ५५० मेट्रीकपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. मागील लाटेत ऑक्सिजनची निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.