नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गेल्या वर्षी दि. १९ ऑगस्ट, २०२० रोजी संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन विभागाच्या वतीने संचालक मंडळास पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच दि. १९ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसा प्रस्तावही जिल्हा उपनिबंधकांनी शासनास सादर केला होता. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये आणि कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी शासनाने पुन्हा दि. ५ जानेवारी, २०२१ रोजी आदेश काढला आणि दि. २० फेब्रुवारी, २०२१ पासून पुढील सहा महिन्यांकरिता मुदतवाढ दिली. दुसऱ्यांदा दिलेली ही मुदतवाढही १९ ऑगस्ट, २०२१ रोजीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर व संचालक तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विश्वास नागरे आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.१४) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ना.पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आश्वासन दिले.
चौकट===
“दोन वेळा मिळाली मुदतवाढ”
बाजार समिती निवडणुका २० ऑगस्ट, २०१५ झाल्या होत्या. १९ ऑगस्ट, २०२० संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली. सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग २४ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार २० ऑगस्ट, २०२० ते १९ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत मुदतवाढ. त्यानंतर, पुन्हा सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग पुन्हा ५ जानेवारी, २०२१च्या पत्रानुसार २० फेब्रुवारी, २०२१ ते १९ ऑगस्ट, २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती.