नाशिक : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ‘नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू’‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’ रचनांच्या सुरेल गायनाने खळाळणाऱ्या गोदेच्या काठी नाशिककर भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुरेल अभंगवाणीचे.शंकाराचार्य न्यासाचा गंगापूर येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात सोमवारी (दि.२३) गायिका गौरी कुलकर्णी यांच्या स्वरांनी नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. त्यांनी प्रारंभी ‘त्वमेव माताच पिता त्वमेव’, श्रीमन नारायणा, गुरुब्रह्मा, गुरू विष्णु आदी प्रार्थना सादर केल्यानंतर जयजय राम कृष्ण हरी भजनाने अभंगवाणीला सुरुवात केली. त्यानंतर गौरी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सुंदर ते ध्यान, अवघे हे पवित्र, विचारले नाहीच कधी मी, म्हारे घर आवो जी, सदगुरू वाचोनी सापडे ना सोय आदी अभंग आणि विठ्ठल भजनांना रसिकांनी भरभरून दाद दिली. स्वाती कुलकर्णी यांनी निवेदन केले, तर तबल्यावर सुभाष लेहणार, हार्मोनियमवर श्रीकांत भड व साइड सिंथेसायझरने महेश कुलकर्णी यांनी संगीतसाथ केली. श्रीनिवास ब्रह्मे यांनी प्रास्ताविक करतानाच गौरी कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. यावेळी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह शंकराचार्य न्यासचे कार्यवाह प्रमोद भार्गवे, विश्वस्थ आनंद जोशी, अवधूत देशपांडे व राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.
‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:59 AM