येवला तालुक्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, मूग, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी केलेली पिके, खते देण्यायोग्य आल्याने शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोयाबीन, बाजरी, कापूस, मका या पिकांना रासायनिक खतांबरोबर योग्यप्रकारे डोस देण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहेत. पण युरिया हवा असेल, तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल, तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले असून दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे.
प्रत्येकवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात. ऐन मोसमात युरिया खताचा डोस पिकांना मिळाला नाही, तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू खरीप हंगाम हा एवढाच आशेचा किरण शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोट....
येवला तालुक्यात युरिया खतासाठी दुकानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आज मका, बाजरी या पिकासाठी युरियाची गरज असून, दुकानदार सांगतात, एक गोणी इतर कोणत्याही खताची घ्या, नंतरच एक गोणी युरियाची मिळेल. दुकानात युरिया खत शिल्लक असून सुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. सरकारने दुकानदारांवर लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- श्रावण पाटील देवरे, संपर्क प्रमुख, स्वाभिमानी संघटना