नाशिक : लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी नाशिक रोडच्या तोफखाना केंद्रात तब्बल १ तास ७ मिनिटे १ सेकंद इतक्या दीर्घ काळ शीर्षासन करीत पायाची टाच मांड्यापर्यंत आणून ती स्पर्श करीत (हिट्स ऑन हिप बाय हिल) सातत्याने ६ हजार वेळा वर-खाली करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. ५० वर्षीय भुयान यांच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्करीदिनीच त्यांनी या अनोख्या विश्वविक्रमाची नोंद केली.
लष्कराच्या तोफखाना केंद्रात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी यापूर्वी केलेल्या अनोख्या विक्रमांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्येदेखील झाली होती. या अनोख्या विश्वविक्रमी कामगिरीसाठी कर्नल भुयान यांनी ७२ व्या लष्करी दिनाची निवड केली. कर्नल भुयान हे ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यामधील बांगरचे रहिवासी आहेत. १९९२ साली लष्करात भरती झालेल्या भुयान हे तब्बल ३४ वर्षांपासून योगसाधना करीत असून देशविदेशातील ३२ योगा सेमिनारला त्यांनी उपस्थिती लावली होती. त्याशिवाय त्यांनी ३ पुस्तके लिहिली आहेत. यापूर्वीच्या विक्रमी कामगिरीसाठी त्यांनी ६ हजार वेळा तशीच कामगिरी करण्यासाठी १ तास ३ मिनिटांचा वेळ घेतला होता. मात्र, शुक्रवारी (दि. १५) या विक्रमासाठी त्यांनी तब्बल २ मिनिटे कमी वेळ घेत स्वत:चाच विक्रम मागे टाकला आहे. या विक्रमी कामगिरीप्रसंगी ब्रिगेडियर जे. एस, गोराया तसेच न्या. ए. एस. वाघवसे, न्या. प्रभाकर आवले, न्या. आशा सारक हे निरीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इन्फो
अपघातामुळे अल्पशे अपंगत्व तरीही...
कर्नल भुयान हे यापूर्वी दुचाकीवरील कसरतीदेखील करीत असत. मात्र, एका अपघातात जखमी झाल्याने त्यांना पायात रॉड टाकून घ्यावा लागला. तशा परिस्थितीतही त्यांनी या कामगिरीची नोंद केल्याने त्यांच्या प्रमाणपत्रातदेखील २० टक्के अपंगत्व असूनही विश्वविक्रमी कामगिरी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
-----
फोटो - १५पीएचजेएन
९३ / ९४ लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी शीर्षासनाद्वारे विश्वविक्रम करताना.
९१ उपस्थित लष्करी अधिकारी आणि कर्मचारी कर्नल भुयान यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करताना.