नाशिक : रविवारी भरणाऱ्या महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गुरुवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी आढावा घेतला. महाआरोग्य शिबिराात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार असून, ही सेवेची संधी म्हणून यंत्रणांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी एकत्रित काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात देशातील नामांकित डॉक्टरसह एकूण साडेचारशे डॉक्टरर्स रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिरामध्ये उपलब्ध असतील असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील एकही गंभीर आजाराचे रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एएनएम आदिंच्या सहकार्याने प्रत्येक घरापर्यंत शिबिराची माहिती पोहोचवावी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात विशेष तपासणी शिबिराचे येत्या दोन दिवसांत आयोजन करून गरजू रुग्णांना शिबिरासाठी पाठवावे. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य तपासणी सप्ताहांतर्गत झालेल्या रुग्ण तपासणीचा आढावा घेतला. महाआरोग्य शिबिर यशस्वी कण्यासाठी शासनाच्या विविध विभागांसह वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना, खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहेत. गोल्फ क्लब मैदानावर मंडप उभारणीचे काम वेगाने करण्यात येत असून, विविध रोगांसाठी स्वतंत्र कक्षासह नोंदणीकक्ष, भोजनकक्ष, मदतकक्ष, रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध राहणार आहे. (प्रतिनिधी)टाटा ट्रस्ट, एंपथी फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, कोनार्क फाउंडेशन आदिंसह विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य यासाठी मिळत असून, वैद्यकीय क्षेत्रातील आणि औषध विक्रेत्यांच्या सर्व संघटनांदेखील शिबिरासाठी सहकार्य करीत आहे.
आरोग्य शिबिराचा घेतला आढावा
By admin | Published: December 30, 2016 12:36 AM