नाशिक : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी मराठा क्रांती मोर्चा व आरक्षणाचे नेतृत्व करण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका झाल्या; परंतु नाशिकमध्ये सर्वसमावेशक झालेली ही पहिलीच बैठक आहे. मराठा क्रांती मोर्चे हे समाजाने सर्व खासदार, आमदार नेत्यांना बाजूला सारून एक होत निर्णय घेतल्याने यशस्वी झाले आहेत. एक नव्हे तर तब्बल ५८ मोर्चे काढण्यात आले. त्यात समाजाची एकजूट दिसून आली. त्यामुळे आजच्या या बैठकीला आपण संभाजीराजे म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून उपस्थित राहिलो आहे. राज्यातील सर्व समन्वयकांनी एकत्र बसून महासमिती करावी व त्या अंतर्गत विविध समित्या करून त्यांना जबाबदारीचे वाटप करावे. त्यासाठी समाजातील आमदार, खासदारांना सहभागी करून घेण्यात यावे, आंदोलनाची रूपरेषा व त्यासाठी लागणारा वेळदेखील ठरवून घ्यावा. मग केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांच्याकडे जाऊन प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहू, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
मुख्य समन्वयक म्हणून संभाजीराजेंना गळनाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय समन्वयक बैठकीत शिवाजी सहाणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षणाचे नेतृत्व स्वीकारण्याबाबत ठराव मांडला. त्यास उपस्थित २८ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी हात उंचावून अनुमोदन दिले. मात्र राजेंनी ते नम्रपणे नाकारल्याने अखेर करण गायकर यांनी राज्यातील सर्व समन्वयक यांचे मार्गदर्शक म्हणून राजेंनी ‘मुख्य समन्वयक’ म्हणून काम पाहावे, अशी सूचना मांडली. त्यास राजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे; नेतृत्व हा गौण विषय : उदयनराजे
सातारा : ‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खा. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन दि. ३ आॅक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या विचार मंथन बैठकीसाठी आमंत्रण दिले. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन दोघांनीही दिले.