लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांकडूनच मोबाइलचा वापर केला जातो. संवादासाठी अत्यंत सोपे व सुलभ असलेल्या या इलेक्ट्रॉनिक वस्तूला इंटरनेटला जोड मिळाल्यानंतर मोठी क्रांतीच घडली. मोबाइलचे स्वरूप बदलून स्मार्टफोन जेव्हा नागरिकांच्या हाती आला तेव्हा तर जणू जगच माणसाच्या हातात आले की काय? अशी शंकाही उपस्थित होऊ लागली. मोबाइलचा वापर दिवसेंदिवस जसा वेगाने वाढत चालला आहे, तसेच मोबाइल चोरी करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मोबाइल चोरट्यांकडून गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवत मोठ्या चलाखीने व्यक्तीची नजर चुकवून मोबाइल लांबविण्याचे प्रकार राजरोसपणे घडतात. तसेच मॉर्निंग वॉक असो किंवा रात्रीची शतपावली असो, यावेळी मोबाइलवर बोलत फेरफटका मारणाऱ्यांच्याही हातातून काही दुचाकीचोरी अलगदपणे मोबाइल हिसकावून धूम ठोकल्याच्या विविध घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
मोबाइल चोरीचा छडा लावताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. सराईत मोबाइल चोरट्यांकडून तर चोरलेल्या मोबाइलमध्ये लवकर सीमकार्ड पुन्हा टाकले जात नाही, तसेच आयईएमआय क्रमांकासोबतही छेडछाड केली जाते आणि त्यानंतर चोरलेल्या मोबाइलचा वापर केला जातो किंवा तो विकला जातो. मोबाइल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या एकापेक्षा अधिक टोळ्या शहरात सक्रिय असल्याचे बोलले जाते. मोबाइल चोरी रोखण्यासाठी सातत्याने शहर गुन्हे शाखेकडून प्रयत्न केले जातात. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकाकडूनही अशा मोबाइल चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, यामध्ये पोलिसांना यश येण्याचे प्रमाण कमी आहे. अत्यंत क्लिष्ट पद्धतीचा हा गुन्हा समजला जातो. कारण या चोरीचे कुठलेही पुरावे तात्काळ पोलिसांच्या हाती लागत नाहीत. एखाद्या खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती लागल्यास त्यावरून पोलिसांकडून सापळा रचून मोबाइल चोरट्याला ताब्यात घेतले जाते.
--इन्फो--
अल्पवयीन मुलांचाही चोरीसाठी वापर
बहुतांश प्रौढ गुन्हेगार मोबाइल चोरीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचेही पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. उपनगर, नाशिक रोड या भागात एका चाळीस वर्षीय गुन्हेगाराकडून त्या भागातील एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने मोबाइल चोरी घडवून आणली जात असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ३१ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.
---इन्फो---
...येथे सांभाळा मोबाइल
नाशिक रोड-उड्डाणपूल भद्रकाली बाजार- जुने नाशिक
पांडवनगरी, इंदिरानगर
मार्केट यार्ड, पंचवटी
गोदाकाठ
नवे, जुने सीबीएस
महामार्ग बसस्थानक
रेल्वेस्थानक, ना.रोड
---इन्फो---
मोबाइल चोरी झाल्यास हे करा...
आपला मोबाइल चोरी झाल्यास सर्वप्रथम अन्य कोणाच्या मोबाइलवरून आपण वापरत असलेल्या सीमकार्डच्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला माहिती द्यावी.
माेबाइल क्रमांक, खरेदीचे बिल घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज देत मोबाइल चोरीची फिर्याद दाखल करावी.
चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याची सत्यप्रत जवळच्या सीमकार्ड सेवा देणाऱ्या कंपनीच्या अधिकृत केंद्रात जाऊन सादर करावी.
तात्काळ नवे सीमकार्ड खरेदी करत त्यावर आपला जुना क्रमांक सुरू करून घ्यावा.
040721\04nsk_9_04072021_13.jpg~040721\04nsk_10_04072021_13.jpg
मोबाइल चोरी~मोबाइल चोरीचा छडा