नवीशेमळी : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बागलाण तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ महिलावर्गावर येऊन ठेपली आहे. शनिवारी (दि.५) नवीशेमळी या गावातील ग्रामस्थांसह महिलांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि त्यांनी रिकामे हंडे घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेत ठिय्या मांडला. दरम्यान, प्रशासनाकडून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.नवीशेमळी गावात पाण्यासाठी महिला-ग्रामस्थांना एक महिन्यापासून पायपीट करावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे महिलांसह ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन दोन तास ठिय्या आंदोलन केले. येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नसल्याने ग्रामपंचायतीने दुसऱ्या खाजगी विहीरीवरु न पाणी घेऊन ग्रामपंचायतीच्या विहीरीत टाकले मात्र, ह्या विहीरीची पाण्याची पातळी खालावल्याने महिनाभरापासून गावाला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. महिलांनी हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरनार यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन दुसरी विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस पाटील तेजस वाघ यांचेसह संदीप वाघ, दत्तू वाघ, बापू वाघ, दिलीप जाधव, तात्या पाटील, विशाल वाघ, बापू वाघ, मनोहर वाघ, मयूर वाघ, अनिकेत वाघ, सरदार जाधव ,आशूतोष वाघ, राजू वाघ, दादाजी निकम आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रिकामे हंडे घेऊन महिलांचा टाहो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:07 PM
तीव्र पाणीटंचाई : नवीशेमळीला ग्रा.पं.कार्यालयासमोर ठिय्या
ठळक मुद्देविहीरीची पाण्याची पातळी खालावल्याने महिनाभरापासून गावाला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.