नाशिक : शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहितगाव येथे कार्यरत लाचखोर तलाठी आरोपी सतिष गिरीश नवले (४८,रा. अक्षराधारा अपार्टमेंट, उपनगर) यांच्यासह त्यांचा खासगी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (४३,रा. उज्वल कॉलनी, चेहडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात जाळ्यात घेतले. तक्रारदाराकडून तडजोडअंती ३ हजार रूपयांची लाच स्वीकारली असता पथकाने बुधवारी (दि.३) अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत होता. यामुळे नाशिकचे तहसीलदार यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र ०.०१चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये एक लाखाचे २५टक्केप्रमाणे २५ हजार रूपयांचा भरणा केला. यानंतर तहसीलदार यांनी नवले यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा, असे आदेश दिले होते.
तक्रारदार यांचे काम प्रलंबित असल्याने नवले त्यांच्यासोबत त्यांचे काम करणारे खासगी मदतनीस ताजनपुरे यांच्याकडे गेले असता त्यांनी त्यांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात नवले यांच्या सांगण्यावरून ४ हजारांची लाचेची मागणी पंचांसमक्ष केली. तडजोडअंती त्यांनी ३ हजारांची लाच घेण्याचे मान्य करत पंचांसमक्ष स्वीकारली असता सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक संदीप घुगे, नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या दोघांविरूद्ध उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.