नाशिक : आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या नवीन तांबट यांचे शिक्षण रुंग्टा हायस्कुलमध्ये झाले. लहानपणी तबला शिकण्यास मिळाल्याच्या संधीचे त्यांनी सोने केले. ते शाळेत व शाळेबाहेरच्या विश्वात जगतमित्र होते. सर्वांसमवेत मैत्री आणि स्नेहाचे संबंध ही त्यांची खासियत होती. कार्यक्रम कोणताही असला तरी स्टेजचा ताबा स्वतःहून घेऊन सर्व व्यवस्था अत्यंत बारकाईने करण्याची त्यांची सवय होती. एकाहून एक श्रेष्ठ संगीतकारांना साथसंगत करुनही कधी त्याचा दिमाख मिरवला नाही. सर सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असायचे. जे काम करणार ते मन लावून त्याला परिपूर्णतेची जोड देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. संगीत कार्यक्रमासाठी त्यांनी परदेशवारीदेखील केली. मात्र, ते मोठेपणदेखील त्यांनी मिरवले नाही. कोणत्याही गोष्टींचा त्यांना अभिनिवेश बाळगायचा नाही.तसेच स्वत: बरीचशी जबाबदारी पार पाडून यशस्वी झालेल्या कार्यक्रमाचे श्रेय सर्वांना देण्याची जणू त्यांना सवयच होती. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत किंबहुना चिडणे, रागावणे त्यांना माहितीच नव्हते. पूर्वी गाजलेल्या मराठी, हिंदी चित्रपटातील वैविध्यपूर्ण भावमधूर गीतांना तबला, ढोलकी, कोंगो, ढोलक अशा वाद्यांच्या साथसंगतीतून खुलवत नेण्याचे त्यांचे सामर्थ्य मोठे होते. लोकहितवादी मंडळ, सावाना बालभवन विभाग, विविध समूह गीत गायन स्पर्धेत त्यांनी हजारो बालके आणि कलाकारांना मार्गदर्शन केले. जुन्या जमान्यातील नाशिकचे संगीतकार बाळ भाटे, अनंत केळकर, मोहन करंजीकर यांच्यासमवेत त्यांनी मोठे कार्य केले. आमच्या बागेश्री वाद्यवृंदलादेखील त्यांनी सतत प्रोत्साहन दिले. चैतन्याचा आणि उत्साहाचा निर्मळ झरा असलेल्या नवीन तांबट यांना नाशिकच्या समस्त संगीतप्रेमींकडून भावपूर्ण श्रद्दांजली.
चारुदत्त दीक्षित, बागेश्री वाद्यवृंद