नाशिक : मंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायांनी कळस गाठला असून, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जात असला, तरी पंचवटी परिसरातील या अवैध व्यवसायांना पोलीसच ‘अभय’ देत असल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत पंचवटीत मटका, जुगार, लॉटरी यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप आहे. अवैध व्यवसाय करणारे व पोलीस कर्मचारी यांच्यात ‘अर्थपूर्ण’संबंध प्रस्थापित झाल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे. शहरात चोऱ्या, वाहनचोरी, घरफोडी तसेच लूटमारीच्या घटना घडत असल्या, तरी पोलिसांकडून त्याकडे काणाडोळा केला जात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने पोलीस पथकासह छापा मारला होता. त्यानंतर अवैध व्यवसाय बंद होतील अशी अपेक्षा होती; मात्र पोलीस उपआयुक्तांनी एकाच अड्ड्यावर छापा मारून समाधान करून घेतल्याने पंचवटीत इतरही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायाबाबत त्या पोलीस उपआयुक्तांना माहिती नाही की माहिती असूनही कारवाई नाही हे गुलदस्त्यात आहे. लॉटरी, मटका, जुगाराबरोबरच परिसरातील हॉटेल्स तसेच लॉजवर खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असून, यांकडेही पोलिसांचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीपाठोपाठ आता अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे जाळे झपाट्याने वाढले असतानाही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांविषयी संशयाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)