नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामचंद्र महाले यांची वर्षभरात बदली झाल्याने त्यांनी महाराष्ट्र न्याय प्राधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या जागी बदली झालेले अधिकारी सोनकांबळे यांनी जिल्हा परिषदेत येऊन तातडीने पदभारही स्वीकारल्याचे वृत्त आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू असून, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विष्णू पालवे यांची मुंबईला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी पदोन्नतीवर बदली झाली आहे, तर अन्य कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कळवण उपविभागात त्याच पदावर बदली झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांच्याही बदलीची चर्चा आहे.वर्षभरापूर्वी मुंबईहून नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामचंद्र महाले यांची बदली झाली होती. विशेष म्हणजे, वर्षभराच्या कार्यकाळात निधी नसलेली कामे मंजूर करण्याबाबत स्पष्टपणे नकार कळविल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींचा रोष ओढून घेतला होता, त्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू
By admin | Published: June 12, 2015 1:49 AM