नाशिक : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, सोबत आकाशातून बरसणाऱ्या जलधारांनी द्विगुणित केलेला गणेशभक्तांचा उत्साह अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत हजारो गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, शहरातून काढण्यात आलेल्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सुमारे एकोणीस लहान-मोठ्या गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.जुन्या नाशकातील वाकडी बारव कारंजापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शहीद अब्दुल हमीद चौकामध्ये महापौर अॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, उपमहापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांच्या हस्ते मनपा कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती करण्यात आली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघ यांनी श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ केला. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक विनायक पांडे, प्रा़ कुणाल वाघ, सुजाता करजगीकर, रामसिंग बावरी, शहर अभियंता सुनील खुने आदिंसह महापालिकेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. वाकडी बारवपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दूधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ झाली.